संधीकालच्या प्रकाशातला हा नश्वरतेचा प्रवास !
फसवी निघाली पुसट प्रतिमा उरले गुढ आभास !
चंचल साऱ्या सावल्यांनी सोडून दिली साथ !
पुढे वाढून ठेवली आहे गडद काळी रात !
आधाराचा शोध घेती माझे चाचपडणारे हात !
अंधाराचा वेढा भोवती , करेल कुणीतरी घात !
क्षितिज रेषा मिटून गेली, सूर्य पावला अंतर्धान !
काळ दिसे पुढे ठाकला, मी कसे वाचवू प्राण ?
सूर्य उगवेल उद्या नभी फुटेल उर्जेचे भांडार !
निश्चल देह पाहण्या माझा, सावल्या गाठतील दार !
@सतीश ज्ञानदेव राऊत





