(कविता जुनी असून कालबाह्य होत नाही हे दुर्दैव ! )
चिरेबंदी वाडा
अवतरले साधू महाराज, गावी पसरली कीर्ती
केली लगबग भक्तांनी, पाहण्या योगीमूर्ती !
काढिले हवेतून भस्म, लिंबातूनी रक्त !
पाहुनी चमत्कार साधूचा, भारावले भक्त !
एक दिवस आली ,एक तरुण विवाहिता मठी
पाहता लाघवी लावण्य, साधूने आवळल्या मुठी!
“दुःख जाणतो मी पोरी , तू पुत्र वरदान मागण्या आली”
ऐकुनी बोल साधूचे, नतमस्तक ललना झाली !
अपार भक्तिपोटी रोज अर्पिला मेवा, केली मनोभावे सेवा !
साधू म्हणे “जर हवा वंशाचा दिवा, तुज लागे अर्पावे देहा !”
कन्या वदली “महाराज, आपण मज पित्यासमान !”
साधू म्हणे, “परी राखण्या पतीचा मान, तुज लागे अर्पावे तन”
“ तुज पतीशी षंढ म्हणुनी हिणवती सारे लोक
निज आशाळभूत नजरांना, तू आतातरी रोख !”
“स्मरते का तो घ्यावया गेला होता फाशी
वेळ नव्हती, परी काळ आला होता खाशी !”
“पोरी ! विधवेचे जिणे, कळप सोडिल्या हरिणी जैसे
ओरबाडतील लक्तरे तुझी कोल्ही, कुत्री वा तरसे”
ऐकुनी उपदेश भोंदूचा, कन्या उठली त्वरेने रागे
पोहोचली घरा निमिषात , ती उल्का समान वेगे !
पतिसन्मुख वदली ती, धाय मोकलून घटीत
संभावना रौद्राची तरीही, पति राहिला शांत !
स्वयें सावरून पति म्हणे, “नको रागावू मजवरी लाडिले !
नसे प्रमाद त्या योग्याचा, मीच तुज तेथे धाडिले !”
“वाडा अपुला चिरेबंदी, मिळकत कैक चौरस
परी नाही अब्रू घराण्या , ना जोवरी येई वारस “
“ना रक्षितो तुझे शील, झालें तर कर मज माफ
कुलदीप घरा आणण्या, जा कर जा तू हे पाप!”
कोसळली हृदयातूनी ती, पडली विलापे अवनी
आघात असह्य जाहला, अश्रू दाटिले नयनी !
परी ओळखली काळाची पाऊले , स्मरिला पद्मिनी जौहर !
सोडिला वाडा चिरेबंदी, गाठिला नदीचा तीर !
वदली, “सरीते , तू घेतले रामा अपुल्या कवेत
दे मोक्ष मजला, ने सागरासी तुज सवेत ”
मिटले नयन थकलेले , झेपावली ती नदीत
दिली आहुती जीवाची, नव्हते कुणा विदित !
ना जाहली शीलभ्रष्ट, मर मिटली ही जरी!
परी शरणागत जाहल्या, किती घरंदाज नारी?
मठाच्या पोटात दडले, असतील कैक बलात्कार…
चिरेबंदी वाड्यात चिरडले, असतील कैक चित्कार..
@ सतीश ज्ञानदेव राऊत !





